Sat. Apr 4th, 2020

१०० दिवस !

मनुष्य जीवनात ‘१००’ या आकड्याला विलक्षण महत्त्व आहे. क्षेत्र कोणतेही असो; पण या आकड्याविना कर्तव्यपूर्ती प्रमाणित होत नाही. शालेय जीवनात १०० गुण असतात, टक्केवारी (पर्संटेज्) १०० चीच असते, शतकही १०० आकड्यानेच पूर्ण होते, ‘शतायुषी होवो’, यांसारख्या अनेक वाक्प्रचारांतही हा आकडा वापरला जातो, पापाचा घडा (शिशुपालाप्रमाणे) १०० या आकड्यानेच भरतो, कौरवही (दुष्प्रवृत्ती) १००च होते. इतकेच काय; पण पोलिसांचे तात्काळ साहाय्य मिळण्यासाठीही दूरभाषवर १०० आकडाच फिरवावा लागतो, इत्यादी.

राजकीय क्षेत्रही या १०० आकड्याच्या आकर्षणाला अपवाद नाही. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे सरकार सत्तेत आल्यास बरेच काही करण्याचे आश्‍वासन दिले होते, तेही याच १०० आकड्याच्या साहाय्याने ! निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांचा अक्षरशः धडाका लावला होता. त्या वेळी भाजप विरोधी पक्षात होता. सरकारच्या चुका, हे कोणत्याही विरोधी पक्षाच्या प्रचाराचे प्रमुख सूत्र असते. काँग्रेसच्या कार्यकाळाच्या समाप्तीच्या वेळी काळ्या पैशांचे सूत्र ऐरणीवर होते. त्याविषयी जनतेमध्ये एक विलक्षण चीड निर्माण झाली होती. नेमके हेच मर्म ओळखून नरेंद्र मोदी यांनी प्रचारासभांत जनतेला ‘आम्हाला निवडून दिल्यास आम्ही १०० दिवसांत विदेशात ठेवलेला काळा पैसा भारतात आणू’, असे आश्‍वासन छातीठोकपणे दिले. जनतेला हे आश्‍वासन मिळून आता साडेचार वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मोदी यांनी सत्ता आल्यानंतर १०० दिवसांत काळा पैसा आणण्याचे दिलेले आश्‍वासन आता त्यांच्या सत्ताकाळाचे शेवटचे उणे-अधिक १०० दिवस राहिले, तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. काळ्या पैशांवर अर्थमंत्री अरुण जेटली यांचे बाळबोध उत्तर ऐकून तर हसावे कि रडावे, तेच कळत नाही. ‘देशात करदात्यांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ, ही काळा पैसा न्यून झाल्याचेच द्योतक आहे. परिणामी भारतीय गंगाजळीत वाढ झाली आहे’, अशा आशयाचे थातूरमातूर उत्तर देऊन ते वेळ मारून नेतांना दिसतात. भाजप सरकारने हा काळा पैसा ठेवणार्‍यांची नावेही घोषित केलेली नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. पारदर्शक कारभाराची टिमकी वाजवणारे सरकार या देशद्रोह्यांची नावे का घोषित करत नाही ? यामागे कोणती राजकीय गणिते आहेत ? सरकार अशा देशद्रोह्यांना का पाठीशी घालत आहे ? या प्रश्‍नांची उत्तरे येत्या ‘१००’ दिवसांत जनतेला निश्‍चितच मिळणार नाहीत. सत्तेचा वापर विरोधकांवर वा संबंधितांवर दबाव टाकण्यासाठी कसा केला जातो, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सत्तेत येणारा कुठलाही राजकीय पक्ष यास अपवाद नसतो.

संदर्भ – सनातन प्रभात.

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?