Sat. Apr 4th, 2020

भारताच्या शिरपेचामध्ये तुरा खोवणार्‍या मोजक्या काही सरकारी संस्थांमध्ये ‘भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था’ (इस्रो) हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

त्याचे कारण म्हणजे अवघ्या ५० वर्षांमध्ये ‘इस्रो’ने घेतलेली गरुडझेप ! ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ या कालावधीत भारताची महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-२’ मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम ९८ टक्के यशस्वी झाली; मात्र अंतिम टप्प्यात विक्रम लँडरचा भारतीय अंतराळ स्थानकाशी असलेला संपर्क तुटल्याने सार्‍यांचा काहीसा हिरमोड झाला; मात्र यामुळे खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लगेचच ‘चंद्रयान-३’ मोहिमेवर लक्ष केंद्रित केले. ‘केंद्र सरकारने ‘चंद्रयान-३’ या मोहिमेला हिरवा कंदिल दाखवला असून वर्ष २०२१ पर्यंत हे यान चंद्रावर झेपावेल’, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. या व्यतिरिक्त ‘वर्ष २०२० मध्ये २५ अंतराळ मोहिमा होणार असून वर्ष २०२२ पर्यंत अंतराळात मानव पाठवण्याची मोहीमही यशस्वी होईल’, असा निर्धार के. सिवन यांनी व्यक्त केला. अवघ्या विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या मोहिमेमध्ये अंतिम ध्येय साध्य करता नाही आले, तरी त्यामध्ये अडकून न राहता पुढील ध्येयावर लक्ष्य केंद्रित करण्याची शास्त्रज्ञांची उर्मी सर्वांनाच प्रेरणादायी आहे. कुठे राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून वेळेचा अपव्यय न करता नवनवीन ध्येय निश्‍चित करून ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ, तर कुठे देशहितार्थ केलेल्या कायद्यांचा अभ्यासही न करता सार्वजनिक संपत्तीची हानी करत हिंसक आंदोलन करणारे !

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांचा कित्ता गिरवण्याचे बाळकडू संस्थेच्या स्थापनेपासूनच बहुधा तेथील शास्त्रज्ञ आणि अभियंता यांना मिळत आहेत. विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा या संस्थेची स्थापना झाली, तेव्हा ‘मिशन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे बैलगाडीतून यानाचे काही भाग घेऊन जायचे. त्या वेळी इस्रोने सोडलेली बरीचशी याने भरारी घेताच समुद्रात पडायची. प्रारंभी मिळालेल्या अपयशामुळे ‘सॅटेलाईट लाँच व्हेइकल’ (उपग्रह प्रक्षेपण यान) ऐवजी ‘सी लव्हिंग व्हेइकल’ (समुद्र आवडणारे यान) असे हिणवले जायचे; मात्र शास्त्रज्ञांनी खचून न जाता त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले. या प्रयत्नांच्या पाण्यावर आता यशाची फुले उमलत आहेत. इतकी की, केवळ भारत नाही, तर अत्यल्प व्ययामध्ये उपग्रहांचे प्रक्षेपण केले जात असल्याने जगातील अनेक देशही त्यांच्या उपग्रहांचे इस्रोच्या माध्यमातून प्रक्षेपण करत आहेत. ही चिकाटी आणि जिद्द केवळ कौतुकास पात्र नाही, तर अनुकरणीय आहे.

चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांच्या भावना दाटून आल्या आणि अश्रू अनावर झाले होते; मात्र शास्त्रज्ञांच्या जिद्दीमुळे ‘चंद्रयान-३’च्या रूपाने अश्रूंची फुले होतील, यात शंका नाही. देशवासियांच्या शुभेच्छा शास्त्रज्ञांच्या पाठीशी कायमच असतील !

संदर्भ – दै. सनातन प्रभात

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?