Sat. Apr 4th, 2020

कोरोना #corona विषाणूची (व्हायरसची) बाधा टाळण्यासाठी उपयुक्त माहिती

कोरोना काय आहे ?

‘कोरोना’ विषाणू हा विषाणूंचा मोठा गट असून या विषाणूंमुळेे सर्दीसारख्या सामान्य रोगापासून श्‍वसनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतात.

२. हा आजार कुठल्या माध्यमातून पसरतो ?

अ. हा आजार ८० टक्के वेळा हातांच्या माध्यमातून पसरतो.
आ. या जंतूंमुळे प्रदूषित झालेले परदेशगमन कक्ष, तिकीट कक्ष, दरवाजाची हँडल्स, जिना किंवा लिफ्टमधील हँडल्स यांना हात लावल्यावर, तसेच हात न धुता चेहरा, डोळे किंवा नाक यांना स्पर्श केल्यावर हा आजार पसरतो.
इ. थेट हवेमधून विषाणू पसरण्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अल्प आहे.
ई. हा विषाणू गर्दीच्या ठिकाणी पसरतो. शाळा, संस्था, विमाने, वातानुकूलित बस, वातानुकूलित रेल्वेचे डबे, इत्यादी ठिकाणी हा रोग पसरण्याचे प्रमाण अधिक असते.

३. आजाराची लक्षणे

आजाराची लागण झाल्यापासून लवकरात लवकर २ दिवस आणि उशिरा म्हणजे १४ दिवसांपर्यंत ताप येणे, खोकला येणे, श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे अन् जुलाब होणे आदी लक्षणे दिसून येतात.

४. आजार होऊ नये, यासाठी प्रतिदिन करावयाच्या प्रतिबंधात्मक कृती

अ. हात न धुता डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करू नये.
आ. अन्न शिजवण्यापूर्वी, स्वयंपाक करतांना आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर, खाण्यापूर्वी, शौचालयात जाऊन आल्यानंतर, जेव्हा हातांवर पुष्कळ धूळ बसलेली असेल, तेव्हा नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने हात धुणे किंवा अल्कोहोल असलेला ‘हँड क्लिनर’ वापरणे, जनावरे, जनावरांचे खाद्य किंवा जनावरांची विष्ठा यांच्या संपर्कात आल्यास, हस्तांदोलन केल्यावर, तसेेच खोकला किंवा शिंक आल्यावर, रुग्णसेवा केल्यानंतर हात धुवावेत. जेव्हा हातावर अधिक प्रमाणात धूळ बसलेली असेल, तेव्हा ३० सेकंद वाहत्या पाण्याखाली साबणाने हात धुवावेत. हातावर धूळ अल्प प्रमाणात असेल, तेव्हा ७० टक्के किंवा अधिक प्रमाणात अल्कोहोल असलेल्या साबणाने (हाताला लावण्याच्या द्रावणाने) हात स्वच्छ करावेत.

इ. खोकतांना किंवा शिंकताना घेण्याची दक्षता

४ इ. १. खोकतांना किंवा शिंकतांना चेहर्‍यावर टिश्यू पेपर किंवा रूमाल किंवा सदर्‍याची बाही धरावी. (हातांचा वापर अजिबात करू नये.)
४ इ. २. वापरलेला टिश्यू पेपर लगेच कचरापेटीत टाकून कचरापेटी त्वरित बंद करावी.
४ इ. ३. रुग्णसेवा करणार्‍याने खोकला किंवा शिंक आल्यावर हात साबण आणि पाणी वापरून किंवा हाताला लावण्याच्या अल्कोहोल मिश्रित द्रावणाने स्वच्छ करावेत.

४ इ. ४. अन्न शिजवतांना घ्यावयाची काळजी

अ. कच्चे आणि शिजवलेले अन्न हाताळणे यांच्या मध्ये हात धुवावेत.
आ. आजारी जनावरे आणि खराब झालेले मांस यांच्याशी संपर्क टाळावा.
इ. भटकी जनावरे, बाजारातील टाकाऊ पदार्थ आणि द्रव पदार्थ यांच्याशी संपर्क टाळावा.
ई. जिवंत असलेल्या जंगली, पाळीव किंवा शेतीला उपयोगी प्राण्यांशी असुरक्षित संपर्क टाळावा.
उ. जनावरे किंवा जनावरांपासून मिळणारी उत्पादने हाताळतांना सुरक्षेसाठी योग्य सदरा, हातमोजे किंवा मास्क घालावेत.
ऊ. ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव असेल, तिथे मांसापासून केलेले पदार्थ खातांना सावधागिरी बाळगावी. हे पदार्थ योग्य प्रकारे शिजवलेले आहेत, याची निश्‍चिती करावी. अन्न तयार केल्यावर योग्य रितीने हाताळले जाईल, असे पहावे.
ए. रुग्णाच्या संपर्कात रहाणे टाळावे.
ऐ. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
ओ. कामावर असतांना काम झाल्यावर कामावरील संरक्षणात्मक कपडे काढून ठेवावेत, अ‍ॅप्रन प्रतिदिन धुवून कामाच्याच ठिकाणी ठेवावेत.
औ. कामावरून आल्यानंतर घामाने भिजलेले कपडे आणि बूट यांच्याशी कुटुंबातील इतर सदस्यांचा संपर्क टाळावा.
अं. चीन किंवा दक्षिण आशिया यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या भागांमध्ये प्रवास करणे टाळावे.

५. आजाराची लक्षणे दिसल्यास काय करावे ?

अ. ताप, खोकला किंवा श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय उपचार घ्यावेत.
आ. रुग्णाच्या प्रवासाविषयीची माहिती जाणून घ्यावी.

६. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नेहमी आणि योग्य पद्धतीने मास्क वापरण्याची पद्धत

अ. शस्त्रकर्म करतांना वापरण्यात येणारा तीन थर असलेला मास्क ९० टक्के प्रभावी असतो.
आ. जेव्हा आजारी असू किंवा आजारी माणसांशी संपर्क होणार असेल, रुग्णालयात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणार असू, तेव्हा मास्कचा वापर करावा.
इ. मास्क ४ ते ६ घंटे वापरून झाल्यावर टाकून द्यावा.

७. इतर काही महत्त्वाच्या कृती

अ. आजारी असलेल्या माणसांपासून एका हातापेक्षा अधिक अंतरावर रहावे.
आ. नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर जागेत रहावे.
इ. आपण वापरत असलेल्या वस्तूंचा पृष्ठभाग १ टक्का ‘आयसोल’ या द्रावणाने निर्जंतुक करावा.
ई. भरपूर झोप घ्यावी.
उ. भरपूर पाणी प्यावे, तसेच पोषक अन्न घ्यावे.

– डॉ. पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

सौजन्य – दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?