Sat. Apr 4th, 2020

वैज्ञानिक दृष्टीतून अग्निहोत्र !

यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता आणि ध्वनी ही ऊर्जेची अंगे मानली जातात. या उष्णता आणि ध्वनीच्या ऊर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारांतून सामान्यांच्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी व्हावा, यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे.

आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्‍या जगात आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञविधी आहे,  याचा आम्ही शोध घेतला असता अग्निहोत्र या यज्ञविधीने आमचे लक्ष वेधून घेतले. सर्व यज्ञांसाठी जागा, मनुष्यबळ, वेळ-काळ, यज्ञसामुग्री, पैसे इत्यादी गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. या सर्व यज्ञांत मन:शांती, आरोग्य आणि पर्यावरणरक्षण होते. तेच सर्व उद्देश अग्निहोत्रात सुद्धा सामान्यातील सामान्य माणसाला लाभू शकतात. हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिमित करण्याचे काम आम्ही गेली ५-६ वर्षे करत आहोत. अग्निहोत्राच्या सर्व लाभांची वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यांपर्यंत देण्यासाठी हा लेखन प्रपंच मी करत आहे.

अग्निहोत्र हा प्रतिदिन केला जाणारा वैदिक संस्कृतीत एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेने अतिशय सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्राचे विधी सामान्यातला सामान्य माणूस म्हणजे सर्व मानवजात सहज करू शकते. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी १० मिनिटांत करू शकता. या यज्ञासाठी प्रत्येक वेळी साधारण खर्च ३ ते ५ रुपये येतो. अग्निहोत्रास सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे लाभ प्रचंड आहेत.

३. अग्निहोत्रासाठी लागणारे साहित्य

अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.

१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवनपात्र
२. गायीच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे
३. गायीच्या शेणाच्या गोवर्‍या ४-५ तुकडे
४. हातसडीचे अख्खे तांदूळ अंदाजे ४-५ ग्रॅम

सूर्योदयाच्या वेळी म्हणावयाचे मंत्र

सूर्याय स्वाहा सूर्याय इदम् न मम ।
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम् न मम ॥

सूर्यास्ताच्या वेळी म्हणावयाचे मंत्र
अग्नये स्वाहा अग्नये इदम् न मम ।
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम् न मम ॥

४. अग्निहोत्राचे परिणाम

अग्निहोत्राचे परिणाम पहाण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला. जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळले. तो भाग म्हणजे रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ ! अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी खालील गोष्टींचे पूर्वमापन करण्यात आले. ते म्हणजे परिसरातील हवेचे विश्‍लेषण अग्निहोत्र प्रयोगांचे खालील उद्दिष्ट्ये ठरवण्यात आली. ती अशी –

अ. अग्निहोत्रामुळे होणारे प्रकाश आणि उष्णता उर्जेतील पालट
आ. अग्निहोत्राच्या धुराचा सभोवतालच्या सूक्ष्म जंतूवर परिणाम
इ. अग्निहोत्राच्या धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम
ई. अग्निहोत्राचा धूर आणि राखेचे रोपे / बी-बियाणे वाढीवर परिणाम
उ. अग्निहोत्राच्या राखेचे औषधी गुणधर्म
ऊ. अग्निहोत्राची राख पाणी शुद्ध राखते

हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले. त्यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी मनापासून भाग घेऊनच उत्तम साथ दिली. तेथील प्रयोगाकरता फर्ग्युसन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्राचार्यांचे साहाय्य, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील प्रयोगशाळा आणि प्राध्यापकांचे साहाय्य माझ्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. आर्थिक साहाय्य प्रज्ञा विकास मंचाचे FROST या संस्थेने पुढाकार घेऊन केले. सर्व आधुनिक विज्ञानयंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील लाभ जगासमोर मांडण्यात यशस्वी ठरलो.

४ अ. ९० टक्के सूक्ष्मजंतूची वाढ थांबली ! : अग्निहोत्रामुळे प्रकाश उर्जेतील पालट हा लक्ष मीटरच्या साहाय्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या आणि नंतरच्या जंतूंची संख्या मोजण्यात आली. अग्निहोत्राने जवळजवळ ९० टक्के सूक्ष्मजंतूची वाढ थांबली असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले; पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फरडाय ऑक्साईडचे प्रमाण दहा पटींनी कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र साहाय्य करत असल्याचे सिद्ध झाले.

४ आ. रोपांची वाढ जोमाने आणि मोठ्या प्रमाणात ! : रोपांच्या वाढीसाठी अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र करण्याच्या खोलीत आणि शाळेच्या बाहेरच्या परिसरात ठेवण्यात आल्या. अग्निहोत्राच्या वातावरणात राख लावून ठेवलेल्या बियांच्या रोपांची वाढ जोमाने आणि मोठ्या प्रमाणात झाली. अग्निहोत्र परिसरात न ठेवलेल्या बियांपेक्षा ती वाढ अधिक प्रमाणात होती, हे आढळून आले. त्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे, हेही सिद्ध झाले.

४ इ. पाण्यातील जंतू आणि क्षारांचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के कमी : अग्निहोत्राची राख जंतूनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग यांवर ती अत्यंत उपयुक्त ठरते, हेही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्राच्या राखेमुळे पिण्याच्या पाण्यातील जंतू आणि क्षारांचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो, हे सिद्ध झाले.

वरील सर्व लाभ केवळ १० मिनिटांत मिळू शकतात. या विधीसाठी रुपये ३ ते ५ खर्च करून प्रत्येक घर प्रदूषणविरहित, जंतूविरहित, पिण्याच्या पाण्यासकट आपण करू शकतो. शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो, हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून जागतिक वैज्ञानिक मासिकात ते प्रसिद्ध करू शकलो. आपल्या पूर्वपारंपरिक विज्ञानाला मानाचे स्थान जगात देऊ शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

५. ७० देशांकडून ‘अग्निहोत्र’ या भारतीय संकल्पनेचा स्वीकार

यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणासाठी वेदांत वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी Mineral Water इतके शुद्ध करून त्याची जागतिक पेटंट्स मिळवली आहेतच; पण त्याकरता सर्वांनीच आपल्याच ज्ञानावर बौध्दिक गुलामगिरी न बाळगता विश्‍वास ठेवणे अत्यावश्यक आहे. या अभ्यासादरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान, सिंगापूर, पेरू, इक्वाडोर, स्विर्त्झर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला आहे. त्यांनी विविध विज्ञान विषयक मासिकांत त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी यावरील शेतीला Homa Farming Technique असे नावही दिले आहे.

६. हाती असलेल्या सोन्याची भारतियांना किंमत नाही !

दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानाला अणूशास्त्र, रसायनशास्त्र, भैतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, वैमानिक शास्त्र, धातू शास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदित केलेल्या देशातील शास्त्रज्ञांनी करून घेवून त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली, आपल्या झोपी गेलेल्या, शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत. प्राचीन विज्ञानावर अशा शास्त्रज्ञांचा विश्‍वास नव्हता; पण तेच ज्ञान गोर्‍या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य, धन्य म्हणून ते स्वीकारणारे शास्त्रज्ञ पाहिल्यावर ‘हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण कथलाचा वाळा हाती बाळगून आहोत’, असे खेदाने म्हणावे लागते.’

– डॉ. प्रमोद मोघे, पुणे. (डॉ. प्रमोद मोघे पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

(संदर्भ : hindi.indiawaterportal.org)

Source – dainiksanatanprabhat.org

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?